बहुजनांची स्थिती मागासलेलीच- ना. राजकुमार बडोले

0
5

देवरी येथे शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा

सुरेश भदाडे

गोंदिया  दि.२१- आज सर्वत्र बदलाचे वारे वाहत आहेत. सर्वच समाज हे प्रगत होत असताना
आपल्या भागातील बहुजन समाजाची स्थिती आजही मागाललेलीच आहे. मानवमुक्तीच्या दृष्टीने विचार
केला तर शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांचे विचार सारखेच
आहेत. यासारख्या कार्यक्रमाच्या आयोजनातून थोर पुरुषांचे विचार सामान्यांपर्यंत पोचविणे शक्य आहे.
यामुळे बहुजन समाजात नवचेतना निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे
सामाजिक न्याय मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी केले.
देवरी येथील शिवाजी संकुलात आयोजित शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण
सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गडचिरोलीचे खासदार अशोक नेते हे होते. स्वागताध्यक्ष
म्हणून आमगावचे आमदार संजय पुराम उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध शिवकथाकार
प.पू. सद्गुरुदास महाराज, विद्याभारतीचे प्रांत संघटक प्रा. सुधाकर रानडे, माजी आमदार केशवराव
मानकर, भेरसिंह नागपुरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे,
देवरीच्या सभापती देवकी मरई, देवरीचे उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, तहसीलदार संजय
नागतिळक, जिल्हा निबंधक दिग्विजय अहेर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे, मूर्तिकार
मेघश्याम डोये, भाजपचे जिल्हा महामंत्री वीरेंद्र अंजनकर, यवतमाळचे आमदार राजू तोडसाम,
गडचिरोलीचे माजी जि.प.सदस्य रवींद्र कोल्हटकर,जि.प. सदस्य अल्ताफ शेख, राजेश चांदेवार,
भाजपचे देवरी तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णा
येरणे, सचिव झामसिंग येरणे आदी मान्यवर उपस्थित होते.
ना. बडोले पुढे बोलताना म्हणाले की, प्रत्येकाने सकारात्मक ऊर्जेचे जतन केले पाहिजे. यामुळे
जीवनात प्रत्येकाला यशस्वी होता येते. शिवाय ज्ञानप्राप्तीसाठी प्रत्येक व्यक्तीने उत्सुक असले पाहिजे.
ज्ञानाला दुसरा पर्याय नसल्याने काहीतरी नवीन शिकण्यासाठी नेहमी विद्यार्थी म्हणूनच जगले पाहिजे.
आपल्या प्रास्ताविकात श्री येरणे यांनी कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्थेच्या वाटचालीवर प्रकाश
टाकला. संस्थेद्वारा चालविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून आज
मागासभागातील सुमारे तीन हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेद्वारा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता
आणि कौशल्य विकासावर विशेषत्वाने भर दिला जात असल्याचे श्री येरणे यांनी सांगितले.
आमदार पुराम यांनी आपल्या भाषणातून आज माणुसकी हरवत असल्याविषयी खंत व्यक्त केली.
आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या मातापित्यांचा सन्मान टिकवून ठेवायचे किंवा नाही, हे येणाऱ्या
नवीन पिढीला ठरवायचे आहे.
तत्पूर्वी, सदगुरुदास महाराज यांनी आपल्या प्रवचनातून शिवचरित्र दर्शन उपस्थितांना करवून दिले.
यावेळी मार्गदर्शन करताना महाराजांची शिवरायांची स्वराज्याविषयी असलेली कल्पकता, दूरदृष्टी,
बांधिलकी आणि नवनिर्मिती याबद्दल सविस्तर विवेचन केले. महाराजांचे किल्ले व दुर्ग निर्मिती,
अफजलखान, दिलेरखान, आगऱ्या सुटका, सुरतस्वारी अशा अनेक विषयांना हात लावून
महाराजांनी इतिहासाचे दर्शन घडवून आणले. यावेळी मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. दरम्यान,
विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आहे.
या सोहळ्याचे बहारदार संचलन प्रा. सविता बेदरकर यांनी केले. उपस्थितांचे आभार सहसचिव अनिल
येरणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. उपदेश लाडे, प्रा. मनीष लेंडे, प्रा. मनोज भुरे,
प्रा. जयश्री भुरे आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या सोहळ्याला सर्व
विद्यार्थी, पालक आणि परिसरातील गणमान्य व्यक्तीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते