दाभना,बोदरा/देऊळगाव व धाबेटेकडीत आजा-नातु,सासु-सुन अमोरा -समोर

0
29

अर्जुनी मोर,दि.16ः- तालुक्यातील बोदरा,दाभना व धाबेटेकडी येथे ग्रामपंचायत निवडणुकीत सासु सुन,आजा नाती,चुलतभाऊ,जावा-जावा अशा रंगतदार लढतीचे चित्र बघावयास मिळत आहेत.तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या धाबेटेकडी ग्रामपंचायत निवडणुकीत दोन पॅनलमध्ये काट्याची लढत होत असून सरपंच पदासाठी दोन्ही पॅनलचे प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात असल्याने थेट लढतीचे चित्र आहे.एका सदस्याची बिनविरोध निवड झाली. सहा सदस्य पदासाठी तिन्ही वार्डात आजा-नातु व सुन -सासु विरूद्ध निवडणुकीचा सामना रंगणार आहे.त्यातच तालुक्यातील बोदरा/ देऊळगाव येथे सरपंच पदासाठी सासु विरुध्द सुनेत रंगतदार लढत बघावयास मिळत आहे.दाभना येथील एका वार्डात सदस्य पदासाठी सासू मीना कविश्वर शहारे यांच्याविरोधात सुन निकिता गजानन शहारे या रिंगणात आहेत. तालुक्यात 40 ग्रामपंचायतीकरीता18 डिसेंबर रोजी मतदान होत आहेत. आज अधिकृतरित्या प्रचारतोफ थंडावली असली तरी प्रत्यक्ष घर भेटीचा प्रचाराचे चित्र आहे. सरपंचाची थेट निवडणूकीमुळे सदस्य पदासाठी निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांचाही उत्साह वाढला आहे.बोदरा/देऊळगाव येथे सासु मंदा योगिराज ढवळे व सुन किरण मिलिंद ढवळे यांच्यात चुरस निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे दोघेही आपणच जिंकणार असल्याचा दावा करीत असले तरी तिसरा उमेदवार काय करताे याकडेही लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे धाबेटेकडी एकमेव आदर्श गाव आहे. आदर्श गावाच्या निर्मितीसाठी सोनवाने कुटंबियांचा सिंहाचा वाटा आहे. येथे वार्ड क्रमांक 1 मध्ये 642, 2 मध्ये 323 आणि 3 मध्ये 264 असे 1229 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सरपंच पद सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव आहे. यासाठी गायत्री नंदेश्वर सोनवणे व त्यांचे प्रतिस्पर्धी संध्या जगदीश आरसोडे या दोघांत थेट लढत आहे. 6 सदस्य पदासाठी 13 उमेदवार रिंगणात आहेत. वार्ड 1 मध्ये अरविंद जांभुळकर यांच्या विरोधात नातू रोशन जांभुळकर इतर एक असे 3 उमेदवार भाग्य आजमावित आहेत.
अरविंद जांभुळकर हे चौथ्यांदा निवडणुक लढवित आहेत. यापूर्वी त्यांनी सदस्य, सरपंच,उपसरपंच पद उपभोगले आहे. आता ते चौथ्यांदा सदस्य पदासाठी पुन्हा भाग्य अजमावित आहेत. याच वार्डात सर्वसाधारण स्त्री राखीव प्रवर्गात दोन सदस्यांसाठी आशा शहारे यांच्या विरोधात सविता शहारे या सुनबाई तसेच खेलन शेंडे,प्रतिमा मानापुरे रिंगणात आहेत. वार्ड दोनमधून सर्वसाधारण प्रवर्गात गजानन कापगते,रवी सोनवाणे, अनुसूचित जाती स्त्री राखीव प्रवर्गातून पायल जांभुळकर यांच्या विरोधात सासू सविता जांभुळकर रिंगणात आहेत. वार्ड तीनमध्ये दोन जागा असून सर्वसाधारण स्त्री प्रवर्गात पुष्पा मानापुरे यांच्या विरोधात सून ललिता मानापुरे निवडणूक लढवीत आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या जागेसाठी भागवत कुंभरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने ते बिनविरोध निवडून आले.