वडेगावचे ग्रामसेवक सिरसाम निलंबित

0
11

सडक अर्जुनी : जवळ असलेल्या ग्राम वडेगाव येथील ग्रामसेवक एस.एस. सिरसाम यांनी ग्रामपंचायतच्या विविध फंडातील निधीची अफरातफर केल्याची तक्रार काही ग्राम पंचायत सदस्य व गावकर्‍यांनी केली होती. सदर प्रकरणाचा सडक अर्जुनी पंचायत समितीतर्फे चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आला. त्या अहवालानुसार १७ लाख ७१ हजार ६५८ रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे सांगण्यात आले. या अहवालाची दखल घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गावंडे यांनी सिरसाम यांना निलंबित केले.
२६ जानेवारी रोजी वडेगाव येथील ग्रामसभेला जमलेल्या ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गावकर्‍यांनी ग्रामपंचायतच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करून आधी हिशोब द्या, नंतर ग्रामसभा घ्यायची असे ठरविले. मात्र ग्रामसेवकाने हिशोब सादर न केल्यामुळे ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्यात आले होते.
ग्रामपंचायत सदस्य राधिका हुकरे, यशोधरा मुनेश्‍वर, सुषमा ब्राम्हणकर, शोभा खोब्रागडे, भाऊराव मेंढे आणि गावकर्‍यांनी पं.स.चे खंडविकास अधिकारी टेंभरे यांच्याकडे चौकशीची मागणी केली. पं.स.ने आपला चौकशी अहवाल सादर केला. त्यामध्ये सामान्य फंड, १३ वा वित्त आयोग, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना, बिआरजीएफ, तंटामुक्त पुरस्कार निधी असे ग्रामपंचायतच्या पाच फंडातील सन २0१४-१५ व २0१५-१६मध्ये १७ लाख ७१ हजार ६५८ रुपयांच्या निधीचा भ्रष्टाचार दिसून येत असल्याचे आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.ग्रामसेवक सिरसाम यांनी महा. ग्रामपंचायत लेखासंहिता २0११ अन्वये आर्थिक अनियमितता केल्याने जि.प. सेवा शिस्त व अधिनियम १९६४ आणि सेवा शिस्त वर्तणूक नियम १९६७ नुसार कार्यवाहीस पात्र ठरवून मुख्य कार्यकारी अधिकारी गावंडे यांनी निलंबन आदेश निर्देशित केले.