लोकआयुक्त आणि उप लोकआयुक्त कार्यालयाचा 2014 चा वार्षिक अहवाल राज्यपालांना सादर

0
12

नागपूर, दि. ७ : लोकआयुक्त आणि उप लोकआयुक्त यांनी सन २०१४ चा आपला  ४२ वा एकत्रित वार्षिक अहवाल राज्यपाल चे.विद्यासागरराव यांच्याकडे दि. ३ जून २०१६ रोजी राजभवन येथे सादर केला. यावेळी लोकआयुक्त म. ल. टहलियानी, उप लोकआयुक्त डॉ. शैलेशकुमार शर्मा व संबधित अधिकारी उपस्थित होते.

          राज्य शासनाच्या वतीने किंवा सार्वजनिक प्राधिकारी (लोकसेवा) यांनी केलेल्या प्रशासकीय कार्यवाहीचा तपास करण्यासाठी आणि पीडित व्यक्तींकडून आलेल्या तक्रारींवर लोकआयुक्त कार्यालयाकडे तोडगा काढला
जातो. या कार्यालयाकडे २०१४ या वर्षात ७  हजार नवीन तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ११४० तक्रारी या केवळ इतर प्राधिकाऱ्यांना उद्देशून होत्या तर काही स्वाक्षरीविरहीत असल्यामुळे अपात्र ठरल्या आहेत. २०१४ या
वर्षात  ५८६० नवीन तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. तसेच मागील वर्षाच्या  ४८०७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याने  एकूण १०, ६६७ प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यापैकी ६६८५ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत, असे या अहवालात नमूद केले आहे.

या संस्थेने सांविधिक स्वातंत्र्याचा पूर्ण वापर करून नि:पक्षपातीपणे आणि जलद गतीने नागरिकांच्या तक्रारीचे निवारण केले आहे.  प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये सखोल चौकशी केल्यानंतर केलेल्या शिफारशीमध्ये बहुधा
विभागाच्या कामकाजामध्ये सुधारणा करण्यासाठी  उपयुक्त सूचना केल्या आहेत त्यातून संबंधित विभागांचे कामकाज अधिक कार्यक्षम व नि:पक्षपातीपणे करण्यास मदत होईल असेही या अहवालात म्हटले आहे.