गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायदा कार्यशाळा

0
9

गोंदिया,दि.१४ : जिल्ह्यात स्त्री भृण हत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज १४ जून रोजी कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेला जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमती भिसे, वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र जैन, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश जयसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यावेळी म्हणाले, या कार्यशाळेच्या माध्यमातून या कायदयाविषयी असलेल्या शंकांचे निराकरण करण्यास मदत होईल. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या २८ सोनोग्राफी केंद्र असलेल्या डॉक्टरांचा या विषयाच्या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या प्रश्नांचे निराकरण करण्यास मदत होईल. जिल्ह्यातील आदिवासी भागात मुलींचा जन्मदर हा मुलांच्या तुलनेत जास्त आहे. गर्भलिंग निदान करण्यासाठी जिल्ह्यातील केसेस शेजारच्या मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्यात जातात. तेथील राज्याच्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी या विषयाच्या अनुषंगाने पत्रव्यवहार केला असल्याचे डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.
हे क्षेत्र बदनाम होऊ नये यासाठी प्रत्येकाने काम करावे असे सांगून डॉ.सूर्यवंशी म्हणाले, यासाठी सेवाभावी संस्था व प्रत्येक व्यक्तीने गांभीर्याने पुढाकार घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात काही डॉक्टर्स त्यांच्या दवाखान्याच्या नाम फलकावर चुकीची वैद्यकीय शिक्षण घेतल्याची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी लिहीत असून त्यामुळे रुग्णांची दिशाभूल होत आहे. अशा डॉक्टर्सवर कारवाई करण्यात येईल. असेही डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.
डॉ.पुलकुंडवार म्हणाले, गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायदयाची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. या कायदयाअंतर्गत गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व तपासणी करण्यासाठी येणाऱ्या महिलेची माहिती ऑनलाईन पध्दतीने भरण्याची तरतूद केली आहे. एफ फॉर्म सुध्दा सोनोग्राफी केंद्राने योग्यप्रकारे वेळीच भरला पाहिजे. डॉक्टरांनी या कायदयाचे तंतोतंत पालन करावे. या कायदयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकशिक्षणाची आवश्यकताही त्यांनी विशद केली.
यावेळी डॉ.राजेंद्र जैन, डॉ.श्रीमती भिसे यांनीही कार्यशाळेला उपस्थित डॉक्टर्स व सामाजिक कार्यकर्त्यांच्या शंकांचे समाधान केले. कार्यशाळेला रेडिऑलॉजीस्ट सर्वश्री डॉ.आर.बी.चहांदे, डॉ.घनश्याम तुरकर, डॉ.कार्तिक लंजे, डॉ.बिनू अग्रवाल, डॉ.स्वाती विद्यासागर, डॉ.पी.एस.भुस्कुटे, डॉ.प्रणिता चिटणवीस, डॉ.मेघा रत्नपारखी, डॉ.सोनल गुप्ता, डॉ.स्मीता आचार्य, डॉ.एस.एन.अग्रवाल, डॉ.रवि जयसवाल, डॉ.संजय बिसेन, डॉ.एस.बी.कार्लेकर, डॉ.मीना वट्टी, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, श्रीमती आशा ठाकूर, संजय बिसेन, अर्चना वानखेडे यांची उपस्थिती होती. संचालन ॲड.रेखा सपाटे यांनी केले. आभार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश जयसवाल यांनी मानले.