आसलपाणी मतदान केंंद्रावरील दारुच्या नशेतील कर्मचार्यांना हटवले,अधिकार्यांची माहिती देण्यास टाळाटाळ

0
13

गोंदिया,दि.१९- तिरोडा विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या गोरेगाव तालुक्यातील आसलपाणी येथील बुथ क्रमांक २२७ मतदान बूथवर पोलिग पार्टीतील 2 कर्मचारी दारू ढोसून मतदारांशी असभ्य वर्तणूक करणार्या कर्मचारी व अधिकार्याला हटविण्याची घटना आज १९ एप्रिल रोजी घडली.यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी व निवडणुक अधिकारी तिरोडा यांना संदेशाच्या माध्यमातून सदर प्रकरणाची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असता या दोन्ही प्रशासकीय अधिकारी यांनी सकाळी घडलेल्या घटनेसंदर्भात रात्री ११ वाजेपर्यंत कुठलीही अधिकृत माहिती देण्याचे टाळल्याने प्रशासकीय यंत्रणेतील घोळ समोर आला आहे.

सविस्तर असे की आसलपाणी येथील मतदान केंद्रावर दारुच्या नशेत व बनियान/पॅंटवर निवडणूक प्रकिया पार पाडून मतदारांशी मतदान अधिकारी श्री.वैकुंठी व श्री.बिसेन हे असभ्य वर्तणुक करीत असल्याची घटना आज १९ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ७.३० वाजेच्या दरम्यान घडली.येथील बुथ क्रमांक २२७ वर चार कर्मचारी मतदान प्रकियेकरीता तिरोडा उपविभागीय अधिकारी व निवडणुक अधिकारी यांच्या मार्फेत नियुक्त करण्यात आले होते.त्यांना १८ एप्रिल रोजी त्याठिकाणी सोडण्यात आले.सदर कर्मचारी अधिकारी हे सकाळी मतदान केंद्र सुरु करायच्यावेळेपर्यंत हे तयार झालेले नव्हते.त्यातच मतदानाकरीता नागरिक पोचल्यानंतर सदर कर्मचारी कसेतरी आपल्या रात्रीच्याच पोषाखात मतदान प्रकिया पार पाडण्याकरीता बुथ असलेल्या शाळेच्या खोलीत गेले.तिथे मतदानाकरीता आलेल्या एका वयोवृध्द महिलेसोबत त्यांचे नातेवाईक सोबत आले कारण सदर वयोवृध्द महिलेला डोळ्यांचा त्रास असल्याने सोबत आलेल्या व्यक्तीने मतदान करावे म्हणून.परंतु त्या केंद्रावर असलेल्या कर्मचारी अधिकारी यांनी सदर नातेवाईक व्यक्तीसोबत वाद घालून मतदान प्रकियेत आडकाठी आणत स्वतःच गोंधळ घालण्याचा प्रकार केला.त्यावेळी सदर कर्मचारी दारुच्या नशेत असल्याचा अंदाज मतदार नागरिकांना आले. तर त्या ठिकाणी गेलेल्या त्या गावच्या पोलिस पाटलांशीही असभ्य वर्तणुक केल्याची माहिती आसलपाणी येथील चर्चेतून समोर आली.या सर्व प्रकारानंतर मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव येथील तहसिलदारांना सदर प्रकरणाची माहिती तेथील नागरिकांनी दिली.तहसिलदारांनी निवडणुक अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांना माहिती कळविल्यानंतर राखीव मधील तीन कर्मचारी तिथे पाठवून त्या बुथ क्रमांक २२७वरील ३ कर्मचारी अधिकारी यांना तिरोडा येथे आणण्यात येऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.

या घटनेसंदर्भात या मतदान केंद्राचे झोनल अधिकारी श्री.कोकुर्डे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.तर निवडणुक अधिकारी व उपविभागीय अधिकारी पुजा गायकवाड यांना यासंदर्भात विचारणा केली असता असे लिहू नका त्यांना अस्वस्थ लागत असल्याने तपासणीकरीता आणल्याचे सांगत अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली.तर जिल्हा निवडणुक अधिकारी व जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनाही यासंदर्भात संदेशाच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आले असता त्यांनीही प्रतिसाद दिले नाही.तर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे निवडणुक निर्णय अधिकारी असलेले भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आले असता त्यांच्यावतीने तिरोडा एसडीओ यांच्याकडूनच माहिती मिळेल असे सांगून यासंदर्भात माहिती नसल्याचे सांगण्यात आले. सदर प्रकरण सकाळी घडलेले असताना प्रशासनाने या संदर्भात लगेच कठोर कारवाई करण्यासंदर्भात पावले का उचलली नाही याबद्दल शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.