टायर्सच्या तुटवड्यामुळे एसटीची चाके थांबली

0
15

साकोली-गावोगावी धावणार्‍या एसटी बसेसना सध्या ब्रेक लागले आहे. राज्यभर प्रवाशांच्या सेवेत असलेल्या एसटीकडे गोरगरीब जनतेचे हक्काचे प्रवासी साधन म्हणून पाहिले जाते. या बसेसना ग्रामीण भागातील जीवनदायीनी म्हटले आहे. मात्र, या जीवनदायीनीला सध्या एका वेगळ्याच समस्येने ग्रासले आहे. या आगासामध्ये टायर्सच्या तुटवड्यामुळे एसटीची चाके थांबली असून याकारणांमुळे साकोली आगाराच्या सात ते आठ फेर्‍या बंद असल्याची माहिती आहे.
शाळा-महाविद्यालयातील मुलांमुलीसाठी एसटी अत्यावश्यक गरज ठरली आहे. केवळ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ग्रामीण भागातील आवश्यक फेर्‍यांना प्राथमिकता देण्यात आली. मात्र, राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील लांब पल्लयाच्या फेर्‍या बंद करण्यात आल्या आहेत.
एसटी बसेस रोज धावतात. दररोज सरासरी किमान दोनशे ते तिनशे किलोमिटर अंतर कापतात. या गाड्यांचे टायर झिजले कि, त्यांची जागा नवीन टायर घेतात. काही कमाल किलोमिटर ह्या बसेस चालल्यानंतर यांचे टायर्स बदलणे आवश्यक असते. अशा नविन टायर्सचा पुरवठा प्रत्येक आगाराला गरजेनुसार केला जातो. मात्र, गेल्या अनेक महिन्यापासून आगारात टायर्स उपलब्ध नाही. फेर्‍या रद्द झालेल्या एसटीचे चालक-वाहकांना त्या दिवसांची रजा टाकायला भाग पाडले जाते.
ही परिस्थिती केवळ साकोली आगाराचीच नव्हे तर इतर असंख्य आगाराची अवस्था आहे. परिणामी महामंडळालाही लाखो रुपयांचा फटका बसला आहे. मुंबई मुख्यालयातून टायर कंपन्यांना रेट कॉन्ट्रॅक्ट न दिल्यामुळे संबंधित टायर कंपन्यांनी टायरचा पुरवठा बंद केल्याची माहिती आहे.