स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले

0
12

भंडारा दि. १४: जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षातील भिंतीवरून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवाजी महाराज यांचे छायाचित्र काढण्यात आल्याने शिवसैनिकांनी गुरूवारला जिल्हा परिषदेत राडा घातला. हा मुद्दा शुक्रवारच्या स्थायी समितीच्या सभेत कृषी सभापती नरेश डहारे यांनी सुरूवातीला लावून धरत दोषींविरूद्ध कारवाईची मागणी केली. यासोबत लघु पाटबंधारे विभागाचा प्रभार देण्यावरून पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले, अशा एकाहून एक विषयांवर आजची स्थायी समितीची सभा चांगलीच वादळी ठरली.

जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा घेण्यात आली. या सभेत समितीचे पदसिद्ध सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, कृषी सभापती नरेश डहारे, समाजकल्याण सभापती नीळकंठ टेकाम, अर्थ व बांधकाम सभापती विनायक बुरडे, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, समिती सदस्य धनेंद्र तुरकर, संदीप टाले, सरिता चौरागडे, होमराज कापगते, प्यारेलाल वाघमारे, मनोहर राऊत, रमेश डोंगरे यांच्यासह सर्व विभागप्रमुख व सर्व खंडविकास अधिकारी उपस्थित होते.

सभेच्या सुरूवातीला कृषी सभापती डहारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांच्या कक्षातील शिवाजी महाराजांचे छायाचित्र काढल्यामुळे शिवसैनिकांनी जिल्हा परिषदेत गदारोळ केला. याला अधिकारी दोषी असल्याचा आरोप केला. शिवाजी महाराज हिंदूंचे आराध्यदैवत असून त्यांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असा निर्वाणीचा ईशारा सभागृहात दिला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. परंतु डहारे यांनी अधिकाऱ्यांची मुजोरी सहन करणार नसल्याचे खडसावून सांगितले. सभापती शुभांगी रहांगडाले यांनीही वाळके यांना चांगलेच खडेबोल सुनावले.