शेतीच्या मालकीप्रमाणेच जंगलाचे मालक म्हणून काम करा- प्रविण परदेशी

0
17

धमदीटोला येथे वनहक्क समिती सभा
गोंदिया,दि.२२ : सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांनी ग्रामसभेच्या माध्यमातून योग्य नियोजन आणि संघटनातून अनेक समस्यांची सोडवणूक केल्याचे दिसून येते. हा भाग जंगलव्याप्त असल्यामुळे शेतकरी वन्यप्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करीत आहे. ज्याप्रमाणे तुम्ही शेतीचे मालक म्हणून काम करीत आहात, त्याचप्रमाणे जंगलाचे मालक म्हणून काम केल्यास त्यापासून भरपूर लाभ मिळेल. असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे अतिरीक्त मुख्य सचिव प्रविण परदेशी यांनी केले.देवरी तालुक्यातील धमदीटोला येथे २१ जानेवारी रोजी सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना आयोजित सभेत अध्यक्षस्थानावरुन श्री परदेशी बोलत होते. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ, मुख्य वनसंरक्षक टिएसके रेड्डी, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट दिल्ली कार्यालयाच्या टिना माथूर, सुशिल चौधरी, खोज संस्थेच्या संचालक पोर्णिमा उपाध्याय, विदर्भ निसर्ग मंडळ संस्थेचे दिलीप गोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेला धमदीटोला, वासनी, मांगाटोला, मेहताखेडा, कोसबी, सुंदरी, पौलझोला, महाका, धवालखेडा, सडक/अर्जुनी तालुक्यातील चिचिडी, दल्ली , खडकी, राजगुडा, मोगरा व उसिखेडा येथील सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.परदेशी म्हणाले, ग्रामसभांनी समित्यांच्या माध्यमातून गावाच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे. ज्या गावांची निवड करण्यात आली आहे त्या तालुक्याच्या तहसिलदार, गटविकास अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांनी दर महिन्याला या गावाच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांच्या समस्या जाणून घेवून तिथल्या विकास कामांना गती दयावी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त या भागातील कामे करावीत. स्वयंपाकासाठी गॅस कनेक्शन मिळाल्यामुळे महिलांना मोठा आधार झाला आहे. या भागातील गावातील इतर समस्याही सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.रेड्डी म्हणाले, इथल्या ग्रामसभेने तेंदूपत्ता न तोडता इतर वनोपजातून उत्पन्नाचे स्त्रोत वाढविले आहे. मोहा संकलनासाठी येथे गोदाम बांधून देण्यात येईल. ॲटोमोबाईल, हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण या भागातील युवकांना देण्यात येईल त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. संयुक्त वन व्यवस्थापनाच्या समितीच्या माध्यमातून ग्रामस्थांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. रामगावकर म्हणाले, इथले ग्रामस्थ् वनहक्क समित्यांच्या माध्यमातून जंगलाचे व्यवस्थापन, सुरक्षा करीत असून त्यामधून आपली उपजिविका करीत आहे. वन व्यवस्थापनासाठी ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक आहे. वन व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यात आला असून विविध विभागांना सोबत घेवून कामे करण्यात येईल. ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.गट ग्रामसभेचे सचिव संतरा मडावी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, पूर्वी ३ गावांनी तेंदूपत्ता संकलनाचे काम केले. ४७ लक्ष रुपयांची तेंदूपत्ता विक्री केली. तलावाच्या खोलीकरणामुळे पाण्याची उपलब्धता झाली. कृषी विभागाने मागील २ वर्षापासून या भागात कामे केले नसल्याचे सांगून आराखडयानूसार प्रस्तावित कामांची माहितीही दिली.यावेळी आलताफ पठाण, जीवन सलामे यांनीही करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. जवळपास १४ गावातील सामुहिक वनहक्क समित्यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.