राज्यघटनेमुळे देशाची लोकशाही व्यवस्था मजबूत- पालकमंत्री राजकुमार बडोले

0
20

गोंदिया,दि.२६ : आधुनिक भारताला सर्वात मोठी मिळालेली देणगी म्हणजे भारतीय राज्यघटना होय. या राज्यघटनेमुळेच देशाला एक मजबूत लोकशाही व्यवस्था मिळाली. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६७ व्या वर्धापन दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस कवायत मैदान कारंजा येथे पालकमंत्री बडोले यांनी केले. त्यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. राष्ट्रध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी परेडचे निरिक्षण केले. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखिव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, नगराध्यक्ष कशिश जायसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले म्हणाले, जगातील श्रेष्ठ राज्यघटनांमध्ये आपल्या देशाच्या राज्यघटनेचा समावेश आहे. राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वानुसार देशाची बांधिलकी स्वातंत्र, समता, बंधुभाव आणि सर्वांसाठी समान न्याय या तत्वांवर आधारीत आहे. असे सांगून ते पुढे म्हणाले, देशातील सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी आणि आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी योजना राबविण्याची जबाबदारी राज्य संस्थेची आहे. आपला भौतिक तथा राजकीय-सांस्कृतिक विकास साधत अत्यंत सन्मानाने जीवन जगण्यासाठी भारतीय राज्यघटनेने कोणत्याही प्रकारच्या जात, धर्म, लिंग, रंग भेदाशिवाय प्रत्येक नागरिकाला अनेक मुलभूत अधिकार दिले आहेत. समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना न्याय देण्यासाठी, तसेच समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि भारतीय महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान न्याय व हक्क मिळाला पाहिजे यासाठी राज्यघटनेत विविध तरतूदी करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदिप पखाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, जिल्हा कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, राजकुमार पुराम, राजेश देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गाणार, सोनाली चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शाम निमगडे, वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक श्री.नौकरकर, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रदिपकुमार बडगे, जिल्हा खनिकर्म अधिकारी भिमराव फुलेकर, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मीक, जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य सचिव देवसुदन धारगावे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी श्री.कातोरे, वन विभागाचे श्री.बिसेन, श्री.शेंडे, उपविभागीय अधिकारी अनंत वालसकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.पोलीस परेडचे संचलन परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राजु नवले यांनी केले. परेडमध्ये पोलीस दल, गृहरक्षक दल, बीट मार्शल पथक, निर्भया पथक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र जलद बचाव दल, होमगार्ड, एन.सी.सी., भारत स्काऊट-गाईड पथक, बुलबुल पथक, रस्ता सुरक्षा पथक, पोलीस बँड पथक, फिरते न्यायवैदयक पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक, शीघ्र कृती दल, दंगा नियंत्रण पथक, गोंदिया नगरपरिषद अग्नीशमन यांनी सहभाग घेतला.जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने कॅशलेस व्यवहाराबाबत जनजागृती तसेच सर्वसाधारण योजनांची सचित्र माहिती दर्शविणारा चित्ररथ, वन्यजीव विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, रस्ता सुरक्षा रथ, सेंद्रीय तांदूळ वापराबाबत जागृती आदी चित्ररथ यामध्ये सहभागी होते. यानंतर विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती मंजुश्री देशपांडे यांनी केले.
उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव
पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यात सशस्त्र सेना ध्वज निधी संकलनाचे २४ लक्ष रुपयाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल सैनिक कल्याण विभागाचे कल्याण संघटक सुभेदार मेजर जगदीश रंगारी, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या चांदलमेटा येथील शारदा स्वयंसहायता बचतगटाच्या अध्यक्ष वंदना उईके यांनी लाख उत्पादन व्यवसायात उत्कृष्ट कार्य करुन कंबोडिया येथील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत सहभागी झाल्याबद्दल, सालेकसा तालुक्यातील कारुटोला येथील सावित्री स्वयंसहायता महिला बचतगट यांनी जिल्ह्यात सर्वाधिक जास्त कर्ज घेवून १०० टक्के नियमीत परतफेड करुन उत्तमरित्या व्यवसायाला सुरुवात केल्याबद्दल, सन २०१५-१६ चा नेहरु युवा केंद्राचा ग्रामीण भागात उत्कृष्ट समाजकार्य केल्याबद्दल हेमंत एज्यूकेशन सोसायटी बसंतनगर गोंदिया यांना २५ हजार रुपयाचा धनादेश व प्रशस्तीपत्र, सन २०१६-१७ या वर्षात स्मार्ट ग्राम या अंतर्गत ग्रामपंचायत कारंजा ता.गोंदिया, ग्रामपंचायत बोदा ता.तिरोडा, ग्रामपंचायत रामाटोला ता.आमगाव, ग्रामपंचायत गांधीटोला ता.सालेकसा, ग्रामपंचायत जेटभावडा ता.देवरी, ग्रामपंचायत पाथरी ता.गोरेगाव, ग्रामपंचायत कोकणा ता.सडक/अर्जुनी, ग्रामपंचायत दाभना ता.अर्जुनी/मोरगाव येथील सरपंच व सचिवांचा, राष्ट्रीय अंध संघटना जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बुध्दीबळ व विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या तौफिक मसुद सैय्यद, होमेंद्र नागपुरे, भुमिता माहुर्ले, मनीषा झोडे, प्रशांत उपराडे या अंध विद्यार्थ्यांचा, केंद्र सरकार पुरस्कृत कायाकल्प योजनेत सन २०१५-१६ या वर्षात उपजिल्हा रुग्णालय तिरोडा या संस्थेला राज्यस्तरावरील प्रथम पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम, राष्ट्रपती पुरस्कार चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या राहूल कुसराम (स्काऊट), दिप्ती डोहरे (गाईड), शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचे गोरेगाव तालुक्यातील १००० शेतकऱ्यांना वर्गणीदार केल्याबद्दल गोरेगाव तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने यांचा, महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सविता तुरकर, कृषि क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रभू डोंगरवार, झाडीपट्टी कलाकार राज पटले, चेतन वडगाये, नारायण मेश्राम यांचा, हॉटेल बिंदल प्लाझा आग दुर्घटनेप्रसंगी मदत करणारे गोंदिया न.प.अग्नीशमन विभागाचे फायरमन मोहनीश नागदेवे, जितेंद्र गौर, अंकीत जैन, पुरुषोत्तम तिवारी, सुधीर मसानी, विनोद मेंढे यांचा,आरोग्य विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी सर्वश्री अशोक तारडे, वेदप्रकाश चौरागडे, विजय पटले, आरोग्य सेविका कल्पना साखरे, सीमा झलके यांचा, बालविकास क्षेत्रात विशेष कामगिरी करुन राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल युवा जागृती संस्थेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांचा, पोलीस विभागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ज्योती बांते यांना रजत पदक, जि.प.समाज कल्याण विभागातर्फे गुडगाव, हरियाणा येथील नॅशनल ब्लाईंड आणि डेफ जुडो स्पर्धेत सहभागी होणाऱ्या योगेश नंदनवार व कोमल राऊत यांना सिल्वर पदक आणि त्रिभुवन रहांगडाले व मदन फुल्लुके यांना कास्य पदक आदींचा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व धनादेश देवून सत्कार करण्यात आला.