कॅशलेस व्यवहार जनजागृती चित्ररथाला पालकमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडी

0
8

जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
गोंदिया,दि.२६ : काळा पैशाला आळा घालणे, भ्रष्टाचारावर नियंत्रण आणि व्यवहारात पारदर्शकता आणून नागरिकांना कॅशलेस व्यवहाराकडे वळविण्यासाठी निती आयोगाने उपाययोजना आखल्या आहेत. रोखरहीत व्यवहाराला चालना देवून कॅशलेस महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त वतीने तयार करण्यात आलेल्या कॅशलेस व्यवहार जनजागृती अभियानाच्या चित्ररथाला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज २६ जानेवारी रोजी प्रजासत्त्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमानंतर पोलीस कवायत मैदान कारंजा येथून हिरवी झेंडी दाखवून या अभियानाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक डॉ.रविकिरण गोवेकर, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता श्री.बोरीकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी अनंत वालसकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसिलदार अरविंद हिंगे, अपर तहसिलदार के.डी.मेश्राम यांची उपस्थिती होती.गोंदिया जिल्हा कॅशलेस होण्यासाठी तसेच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी चित्ररथावरील संदेश व माहिती उपयुक्त ठरणार आहे. कॅशलेसची चळवळ गतीमान करुन गोंदिया जिल्हा कॅशलेस व्यवहाराकडे निश्चित वळणार असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले.रोखरहीत व्यवहाराला चालना देवून जास्तीत जास्त नागरिकांना कॅशलेस व्यवहार अवगत करण्यासाठी हा चित्ररथ गोंदिया जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात जनजागृती करणार आहे. रोखरहीत व्यवहार कसे करावेत यासंबंधित चित्रफित दाखवून नागरिकांची रोखरहीत व्यवहारासंबंधी जागृती करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने माझा मोबाईल -माझी बँक, ई-बटवा, डिजीटल पेमेंट, भिम ॲप, युपीआय, बँक कार्ड, पॉईंट ऑफ सेल मशीन व आधारकार्ड, युएसएसडी, प्रिपेड वॉलेट, एईपीएस, पीओएस यांच्या वापराबाबत सचित्र माहिती तसेच चित्रफित दाखवून नागरिकांचे रोखरहीत व्यवहारासंबंधी प्रबोधन करण्यात येणार आहे. कॅशलेस व्यवहारामुळे अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणण्यात व ती बळकट करण्यास हे अभियान उपयुक्त ठरणार आहे.