साखरीटोला-तिरखेडी रस्त्याच्या पुलाचे लोकार्पण

0
12

गोंदिया,दि.२६ : जिल्ह्यात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनांच्या लाभामुळे ग्रामीणांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. साखरीटोला-तिरखेडी दरम्यान बाघ नदीवर बांधण्यात आलेल्या पुलामुळे या भागातील अनेक समस्यांची सोडवणूक करण्यास मदत होणार आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.सालेकसा तालुक्यातील साखरीटोला-गांधीटोला-तिरखेडी दरम्यान बाघ नदीवर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून बांधण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण पालकमंत्री बडोले यांनी आज २६ मे रोजी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार संजय पुराम, जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जि.प.समाज कल्याण समिती सभापती देवराज वडगाये,  जि.प.सदस्य लता दोनोडे, माजी जि.प.महिला व बालकल्याण समिती सभापती सविता पुराम,परसराम फुंडे, सालेकसा पं.स.चे माजी सभापती बाबुलाल उपराडे, माजी जि.प.सदस्य कल्याणी कटरे, माजी पं.स.सदस्य संगीता शहारे, तिरखेडीच्या सरपंच मंगला मडावी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे उपअभियंता डी.पी.कापगते यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, या पुलाच्या सुविधेमुळे पावसाळ्यात वाहतूक पूर्ववत सुरु राहणार आहे. पावसाळ्यात कामानिमित्त, बाहेरगावी ये-जा करणाऱ्यांना सुविधा उपलब्ध झाली आहे. याच काळात शाळा व महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळता येणार आहे. तसेच रुग्णांना देखील उपचारासाठी दवाखान्यात जाणे शक्य होणार आहे. जिल्ह्यात विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा अंकुश असला पाहिजे असे ते म्हणाले.
साखरीटोला-गांधीटोला-तिरखेडी मार्गावरील बाघ नदीवर १८० मीटर लांबीचा हा पूल बांधण्यात आला असून या पुलाला १० मीटरचे १८ गाळे आहेत. हा पूल महाराष्ट्र ग्रामविकास संस्थेअंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून बांधण्यात आला आहे. पुलाच्या बांधकामावर ६ कोटी २० लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या दिवसात पुजारीटोला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे हा मार्ग तीन ते चार दिवस सतत बंद राहायचा. त्यामुळे शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी, रुग्ण व नागरिकांची गैरसोय व्हायची. पुलाच्या सुविधेमुळे पावसाळ्यात देखील या मार्गावरील वाहतूक अखंडीतपणे सुरु राहणार आहे. पुलामुळे परिसरातील नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. पुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला तिरखेडी व गांधीटोला येथील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार उपअभियंता डी.पी.कापगते यांनी मानले.