वन प्रशासकीय भवनासह वन संकुलाचे उद्घाटन

0
10

गडचिरोली,दि.27 : मोठ्या प्रमाणात वनसंपदा लाभलेल्या गडचिरोली जिल्ह्यात तेंदुपत्ता, बांबू आणि मोहफुलासारख्या वनोपजावर प्रक्रिया उद्योग आल्यास या जिल्ह्यातील आदिवासी बांधवांमध्ये मोठी समृद्धी येईल आणि त्यांचे जीवनमान बदलेल, असा विश्वास व्यक्त करून त्यासाठी वनविभागाची तयारी सुरू आहे, अशी माहिती राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गडचिरोली येथील मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांचे कार्यालय असलेल्या वन प्रशासकीय भवन आणि वनसंकुल वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.सर्वप्रथम फित कापून आणि नामफलकाचे अनावरण करून ना.मुनगंटीवार यांनी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांचे कार्यालय असलेल्या वन प्रशासकीय भवनाचे आणि वन संकुलाचे उद्घाटन केले.

येथील पोटेगाव मार्गावर असलेल्या या इमारतीचे उद्घाटन वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी मंचावर जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, खासदार अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, राज्याचे वन सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी शंतनू गोयल, नगराध्यक्ष योगिता पिपरे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (नागपूर) श्री भगवान आदी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.यावेळी वनमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण तसेच वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे नियोजन स्पष्ट करणाऱ्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच सुबक वास्तू वेळेत तयार केल्याबद्दल अधीक्षक अभियंता प्रदीप खवले व इतर अभियंत्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.