सिरोंचा येथे स्वतंत्र एसडीओ कार्यालयाची निर्मिती करा:आदिवासी विद्यार्थी संघ

0
13

सिरोंचा,दि.24: उपविभागीय कार्यालय सिरोंचापासून ११० किलोमीटर अंतरावर असल्याने शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना विविध दाखले मिळविण्यासाठी प्रचंड गैरसोय होत असते. ती टाळण्यासाठी सिरोंचा येथे स्वतंत्र उपविभागीय कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
जिल्हाधिकारी एएसआर नायक आज सिरोंचा दौऱ्यावर आले असता त्यांनी तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आविसंच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन स्वतंत्र उपविभागीय अधिकारी कार्यालय निर्मिती व अन्य मागण्यांसंदर्भात निवेदन दिले.शिष्टमंडळात आविसंचे तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, माजी उपसरपंच रवी सल्लमवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आकुला मल्लिकार्जुनराव, कुम्मरी सडवली, रागम किष्टास्वामी, दुर्गम तिरुपती, इरपा सरपंच, शिवनारायण गट्टू चम्मकरी, लक्ष्मण बोल्ले यांचा समावेश होता.
सिरोंचा तालुका जिल्ह्याच्या टोकावर असून, जिल्हा मुख्यालयापासूनचे अंतर २२०, तर अहेरीपर्यंतचे अंतर ११० किलोमीटर आहे. सिरोंचा येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय नसल्याने नागरिकांना ११० किलोमीटर अंतरावरील अहेरी येथे जावे लागते. परिणामी विद्यार्थी, शेतकरी व अन्य नागरिकांना विविध दाखले मिळविण्यासाठी गैरसोयीचे होते. शिवाय त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. सिरोंचा शहर हे ब्रिटिशकालीन जिल्हा मुख्यालय होते. परंतु स्वातंत्र्यानंतर या तालुक्याचा विकास झालेला नाही. हा तालुका अविकसित, डोंगराळ व नक्षलग्रस्त असून, पातागुडम, झिंगानूर, रेगुंठा इत्यादी परिसरातील नागरिकांना अहेरी येथे लहानसहान कामासाठी जाणे गैरसोयीचे आहे, असे आविसं पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. स्वतंत्र एसडीओ कार्यालय निर्माण झाले नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आविसं कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.
शिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी व जीओ नेटवर्कबाबतही आविसं पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. सिरोंचा तालुक्यातील अनेक महिलांची नावे सातबारावर आहेत. परंतु त्यांचे आधार कार्ड तेलंगणा राज्यातील असल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी त्रास होत आहे. यावरही तोडगा काढावा, अशी मागणी आविसंने केली. याप्रसंगी अहेरीचे उपविभागीय अधिकारी ए.पी.चोरमारे, सिरोंचाचे प्रभारी तहसीलदार एस.सी.काडर्लावार, संवर्ग विकास अधिकारी खिराडे उपस्थित होते.