वनाधिकाऱ्यांच्या निवासासमोर चंदनवृक्षांची अवैध तोड

0
28

नागपूर,दि.26 – वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या निवासस्थानासमोरील महानगरपालिकेच्या हद्दीतील तीन चंदनाच्या झाडांची अवैधरीत्या तोड झाल्याने खळबळ उडाली आहे. तोडलेली चंदनाची झाडे वनविभागाने ताब्यात घेतली असून, आज (दि. २६) महानगरपालिकेकडे हस्तांतरित केली जाणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या जुन्या कार्यालयासमोरील महानगरपालिकेच्या जागेवर चंदनाची झाडे आहेत.

त्यातील तीन झाडे रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी तोडली आणि एक ते दोन लाकडे घेऊन आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. वनाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर अवैध वृक्षतोड झाली. मात्र, संबधित वनाधिकाऱ्यांनी त्याची दखलही घेतली नाही. त्या प्रकरणाची तक्रार पोलिसात अथवा वनविभागाला करणे अपेक्षित होते. यावरून ते अधिकारी वनसंवर्धन आणि संरक्षणाबद्दल गंभीर नसल्याचे बोलले जात आहे. सेमिनरी हिल्सच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी दिली. त्यानंतर त्यांनी त्या प्रकरणाची दखल घेऊन चंदनाची तीन झाडे ताब्यात घेतली आहेत. महानगरपालिकेच्या हद्दीतील ती झाडे असल्याने हे प्रकरण महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात येणार आहे. झाडे कोवळी असून, त्याची किंमत हजारो रुपये असल्याचे माहिती आहे.