तीन तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर- कृषी अधिकारी इंगळे

0
37

गोंदिया,दि.८: खरीप हंगाम २०१७ पासून राज्यात दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार दुष्काळ जाहीर करण्याचे सुधारित निकष व कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक या सर्व घटकांचे सामान्य, सौम्य व गंभीर असे वर्गीकरण करण्यात आले आहे. जून व जुलै महिन्यात एकूण सरासरी पर्जन्यमानाच्या ५० टक्केपेक्षा कमी पाऊस झाल्यास दुष्काळाची प्रथम कळ लागू होईल. जून ते सप्टेबर या कालावधीत सरासरी पर्जन्यमान ७५ टक्केपेक्षा कमी असल्यास देखील दुष्काळाची प्रथम कळच लागू राहील. ७ ऑक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार जर पहिल्या टप्प्यात दुष्काळाची प्रथम कळ लागू झाल्यास ४ प्रभावदर्शक निर्देशांकापैकी खराब स्थिती दर्शविणारे ३ निर्देशांक असल्यास गंभीर स्वरुपाचा दुष्काळ, ३ निर्देशांकापैकी २ मध्यम किंवा २ खराब निर्देशांक असल्यास मध्यम स्वरुपाचा दुष्काळ व ३ निर्देशांक जर सामान्य असतील तर स्थिती सामान्य स्वरुपात दर्शविण्यात येईल.
या निकषांपैकी पर्जन्यमानाची आकडेवारी हवामान खात्याकडून व पेरणी क्षेत्राची माहिती कृषि विभागाकडून घेण्यात येते. वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता निर्देशांकाची आकडेवारी, महालनोबीस क्रॉप्ट फोरकास्ट सेंटर नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावरुन घेण्यात येते. महालनोबीस क्रॉप्ट फोरकास्ट सेंटर ही माहिती रिमोट सेन्सींग व उपग्रहाच्या माध्यमातून गोळा करते. जलविषयक निर्देशांकाबाबतची माहिती ही भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून घेण्यात येते.
जिल्ह्यात ४ निर्देशांकापैकी ३ खराब निर्देशांकाचा विचार केला असता शासन निर्णयानुसार गोंदिया, गोरेगाव, तिरोडा व देवरी येथे मध्यम स्वरुपाचा दुष्काळ दिसून येत आहे. त्यामुळे या चार तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ प्रस्तावित करण्यात आला असून राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समिती, कृषि आयुक्तालय पुणे यांना अर्जुनी/मोरगाव तालुका वगळता उर्वरित ७ तालुक्यात गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्याबाबत जिल्हाधिकारी यांचे पत्र सादर करण्यात आले आहे.
दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात राज्यस्तरीय समितीची सभा कृषि आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली २६ ऑक्टोबर रोजी झाली. या सभेत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी उपरोक्त निकष हे भात पिकाकरीता योग्य वाटत नसल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात अर्जुनी/मोरगाव तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करावा. सप्टेबर २०१७ चे महिन्याचे प्रपत्र अ व ब विचारात न घेता माहे जुलै व ऑगस्टचे देखील प्रपत्र विचारात घेतल्यास देवरी व सडक/अर्जुनी या तालुक्यांचा समावेश मध्यम स्वरुपाचा दुष्काळ म्हणून करावा तसेच इतर तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करावा असे नमूद केले आहे.
राज्यस्तरीय समिती निकषात बदल करण्यास सकारात्मक असल्याचे सभेच्या इतिवृत्तात नमूद केले आहे. ३० ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व गोरेगाव या तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी दिली.