कोणतेही साहित्य निवडा, वाचन करा- पृथ्वीराज बी.पी.

0
30

दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा समारोप
भंडारा,दि. 29 :- कॉमिक्स वाचत असतांनाच मी ग्रंथाच्या प्रेमात पडलो. बालपणी रशियन व भारतीय पुस्तकांची प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. त्यात पुस्तक घेतले त्या दिवसापासून माझे वाचनाशी नाते जुळले व मी ग्रंथ वाचनाकडे आकर्षित झालो. मला रशियन साहित्याची फार आवड आहे, आजही मी आवर्जून ते वाचतो. म्हणून कोणतेही साहित्य निवडा व ते वाचा, असा सल्ला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 28 व 29 नोव्हेंबर रोजी जकातदार विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय भंडारा येथे जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथोत्सवाच्या समारोपीय भाषणात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झाडीपट्टीतील ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र बोरकर होते तर शिक्षणाधिकारी मोहन चोले, मुख्याध्यापिका मंदा चोले, जिल्हा ग्रंथपाल खुमेंद्र बोपचे प्रामुख्याने उपस्थित होते.
पृथ्वीराज पुढे म्हणाले, आजच्या काळात आपणास पुस्तकांसोबत ई-बुक उपलब्ध आहेत. त्यावर वाचन करा. साहित्य कोणतेही असो त्याची निवड करा व वाचा, त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते, म्हणूनच ग्रंथ हा आपला जवळचा मित्र आहे. आजच्या पिढीत वाचन हे बोरिंग ॲटम आहे अशी धारणा झाली आहे. ती बदला. वाचनाप्रती आवड निर्माण करा. प्रत्येकाला आवडीच्या लेखकाचे साहित्य व कोणत्या ना कोणत्या विषयाची आवड असते. त्याची निवड करा व ते अवश्य वाचा. महान व्यक्तींचे आत्मचरित्र वाचा, विविध भाषेतील साहित्य वाचा . त्यामुळे वाचनाची आपोआप आवड निर्माण होईल, असेही ते म्हणाले.
नाच रे मोरा आंब्याच्या बनात या कवितेचा सूर घेऊन ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र बोरकर यांनी आपल्या झाडीपट्टी शैलीत साहित्याची जडणघडणीबद्दल बोलतांना सांगितले की, सजग पुस्तकांच्या सहवासात रहा. कवितेचा आस्वाद घ्या. काव्य प्रकारात अनेक गमती जमती मजेदार असतात त्यांचा आस्वाद घ्या. क्रमिक पुस्तकासोबत इतर साहित्याचे वाचन करा, ज्ञान समृध्द व्हा. वाचन हे भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. मी आजही वाचन करतो त्यामुळे मी घडलो आहे, असेही ते म्हणाले. मराठी व्याकरणात आजही स्पर्धा परिक्षेतील विद्यार्थी कमजोर आहेत कारण वाचनाचा अभाव हे त्याचे कारण आहे. मोठमोठया पदावर असलेल्या व्यक्तींनाही साहित्याची भाषा कळत नाही म्हणून ग्रंथाचे वाचन करा. श्रध्दा व श्रम कायम ठेवा तर यश कोणीही हिरावणार नाही, असे त्यांनी सांगितले.
शिक्षणाधिकारी चोले म्हणाले, आजच्या काळात ग्रंथाच्या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये असलेली अनास्था दिसत आहे. काळानूरुप बदल आवश्यक आहे. परंतु ही बाब चांगली नाही. विद्यार्थ्यांचा वृत्तपत्र वाचनाकडे कल असावा. स्पर्धेच्या काळात पूढे जावयाचे असेल तर वाचनाची आवड महत्वाची आहे. वाचनाचे सातत्य टिकावे यासाठीच ग्रंथोत्सवाचे आयोजन आहे. ग्रंथ हेच खरे गुरू आहेत म्हणून वाचनाची आवड निर्माण करा, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापिका मंदा चोले यांनीही मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमात उपस्थिताचे आभार जिल्हा ग्रंथपाल खुमेंद्र बोपचे यांनी मानले.