आमगाव खुर्द ग्रा.पं. निवडणूक; साखळी उपोषणाला सुरुवात

0
11
सालेकसा ,दि.२८-: जोपर्यंत आमगाव खुर्द ग्रामपंचायतीचा सालेकसा नगरपंचायतीमध्ये समावेश होत नाही, तोपर्यंत सर्व प्रकारच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका आमगाव खुर्दवासीयांनी घेतली होती. १३ सदस्यीय असलेल्या ग्रामपंचायतमध्ये फक्त एका प्रभागात एकच उमेदवार निवडणुकीसाठी उभा असल्याने त्यासाठी त्या प्रभागातील नागरिक  (दि.२७) मतदान असल्याने मतदान करणार, की नाही याकडे लक्ष लागले असताना तालुका प्रशासनाने मतदान केंद्रच लावले नाही. त्यामुळे ही निवडणूक होऊ शकली नाही. जर उमेदवार निवडणुकीला उभे नसते व प्रशासनाने मतदान केंद्र लावले नसते तर समजले असते. मात्र, एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतानाही प्रशासनाने मतदान केंद्र का लावले नाही? असा सवाल उपस्थित होत असून, ग्रामस्थांनी ‘नोटा’चा उपयोग केला असता, अशीही चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती. तर दुसरीकडे जोपर्यंत आमगाव खुर्द ग्रामपंचायतीचा समावेश सालेकसा नगरपंचायतीमध्ये करण्यासाठी आजपासून ग्रामस्थांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
सालेकसा नगरपंचायतीमध्ये आमगाव खुर्द ग्रामपंचायतचा समावेश करण्यात यावा, यासाठीची याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल आहे. यापूर्वीच्या घोषित ग्रामपंचायतच्या निवडणुकीवरही ग्रामवासीयांनी बहिष्कार टाकला होता. त्यानंतर पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला यासाठी आज निवडणूक होती. परंतु, प्रभाग क्र.५ मधून एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने कायम ठेवल्याने मतदान होणार, की नाही याकडे लक्ष लागले होते. परंतु, तालुका प्रशासनाने मतदान केंद्रच उभारले नसल्याने  यासाठी मतदान होऊ शकले नाही. तर दुसरीकडे ग्रामस्थांनी नगरपंचायतीमध्ये समावेश व्हावा यासाठी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाला माजी आमदार रामरतन राऊत यांनी भेट दिली. एकंदरीत आमगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या समावेशाला घेवून प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.
एकच उमेदवार असल्याने मतदान केंद्र नाही
या प्रकरणी तालुका प्रशासनाशी संपर्क केला असता प्रशासनाने एकच उमेदवार रिंगणात असल्याने त्याची निवड निश्चित असल्याने मतदान केंद्र लावले नसल्योच सांगितले. मात्र, ‘नोटा’ संदर्भात विचारले असता प्रशासनाने माहिती देण्यास असमर्थता दर्शविली