तंबाखू नियंत्रण कायद़याची कठोर अंमलबजावणी होणार

0
17

गडचिरोली, ता.8: उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, राज्य शासनाने तंबाखू नियंत्रण कायदा-२००३ मधील कलम ६ ची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून, शाळा, महाविदयालयांपासून १०० मीटर आत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
राज्य शासनाने यापूर्वीही तंबाखू नियंत्रण कायद़याची अंमलबजावणी केली होती. परंतु निर्णयाचे कठोर पालन होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ७ माचे रोजी एक परिपत्रक काढून कठोर अंमलबजावणी करण्याची सक्त ताकीद संबंधितांना दिली आहे. या कायदयातील कलम ६ च्या नियम ३ नुसार शाळा वा महाविदयालय प्रमुखाने प्रवेशद़वारावर सूचनाफलक लावणे बंधनकारक करण्यात आले असून, कायदयाचे उल्लंघन करणाऱ्यावर २०० रुपये दंड आकारण्याचे ठरविले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू नियंत्रण कायदयाच्या कलम ४ व ६ नुसार, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे होणाऱ्या अपायकारक परिणामांबाबतचा मजकूर शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णयही राज्य शासनाने घेतला आहे. ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त टाटा मेमोरियल हॉस्पीटलमध्ये आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळा, महाविदयालयांपासून १०० मीटरच्या आंत तंबाखूविक्रीवर बंदी घालण्याचे तसेच विदयार्थी व नागरिकांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करुन व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्याअनुषंगाने उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे व राज्यातील सर्व शैक्षणिक व अन्य संबंधित विभागप्रमुखांना सूचना करुन त्याबाबतचा अनुपालन अहवाल १० मार्चपर्यंत सादर करण्यास शासनाने संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना बजावले आहे.