लाखनीत शेतकर्‍यांचे गाजर वाटप आंदोलन

0
9

लाखनी,दि.09ः- तालुक्यातील मुंडीपार येथील भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (भेल) प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन सहा वर्ष झाली आहेत. मात्र, अजूनही या प्रकल्पाला सुरुवात झालेली नाही. हा प्रकल्प सुरु झाल्यावर स्थानिक तरुणांना या प्रकल्पात रोजगार मिळेल, असे आश्‍वासन सरकारतर्फे देण्यात आले होते. या प्रकल्पासाठी २५0 शेतकर्‍यांनी ५५0 एकर शेतजमीन विकली होती. मात्र, प्रकल्पाचे कामच सुरू न झाल्याने नाराज असलेल्या गावकर्‍यांनी सरकारच्या विरोधात गाजर वाटप आंदोलन केले.
या प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान यांच्या हस्ते करण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ला लागून असलेल्या सरकारच्या या प्रकल्पासाठी २५0 शेतकर्‍यांची ५५0 एकर शेतजमिन विकत घेण्यात आली होती. तसेच प्रत्येक प्रकल्पग्रस्त कुटुंबाला ६ लाख १0 हजाराचे पॅकेज देण्यात आले होते. प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला याच प्रकल्पात नोकरी देण्याचे आश्‍वासनही सरकारकडून देण्यात आले होते.
प्रकल्पासाठी एवढे सगळे आश्‍वासन देऊन सरकार प्रकल्प सुरुच करत नसल्याच्या निषेधार्थ शेतकर्‍यांनी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी मोफत गाजर आंदोलन केले. प्रकल्पाचे आश्‍वासन देऊन सरकारने आम्हाला गाजर दाखवल्याचे म्हणत गावकर्‍यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे अभिनव आंदोलन केले.
यासाठी गावातील एका बेरोजगार तरुणाने थेट गुजरातमधून १0४ किलो गाजर मागवले. या प्रकल्पामुळे सुमारे पाच हजार लोकांना नोकर्‍या मिळण्याची आशा होती. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांच्या हमरीतुमरीच्या वादात येथील बेरोजगार तरुण भरडला जात आहे