आमगाव-देवरी विधानसभेतील आदिवासी भागाचा विकास झाला का? : कोरोटे

0
23

देवरी,दि.08 : आमगाव-देवरी विधानसभा व लोकसभा क्षेत्र हा आदिवासी जातीकरिता राखीव आहे. या क्षेत्रामध्ये आदिवासींच्या कल्याणासाठी आदिवासी विकास महामंडळ व आदिवासी विकास प्रकल्प कार्यरत आहे. तरीही दुर्गम भागात असलेल्या शंभर टक्के आदिवासी गावात रोड रस्ते व नाल्यावर पुलांचे बांधकाम अद्याप झालेले नाही, यालाच आदिवासी भागाचा विकास झाला असे म्हणावे काय? असा रोखठोक प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केला. ते देवरी तालुक्यातील चिचगड येथे आदिवासी बिरसा मुंडा स्मारक समितीच्या वतीने आयोजित क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती सोहळा व सामाजिक प्रबोधन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या सोहळ्याचे उद्घाटन आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंह दुधनांग यांच्या हस्ते आणि चिचगडचे ठाणेदार नागेश भास्कर यांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी चिचगडचे सरपंच कल्पना गोस्वामी, इंदल अरकरा, लोकनाथ तितराम, बळीराम कोटवार, नरेश राऊत, जैपाल प्रधान, मोतीलाल पिहदे, कृष्णा कुरसुंगे, सोनू नेताम, नंदलाल भोयर, शाहिला शेख, नितू कोल्हारे, शारदा सलामे, अहिल्या भोयर, प्रगती कोल्हारे यांच्यासह चिचगड परिसरातील बहुसंख्य महिला, पुरुष व युवकवर्ग प्रामुख्याने उपस्थित होते. .

यावेळी मार्गदर्शन करताना कोरोटे म्हणाले, या विधानसभा क्षेत्रात अनेक आदिवासी सहकारी संस्था आहेत. या संस्थेद्वारे सध्या धान खरेदी केंद्र सुरू आहे. परंतु या केंद्रावर बारदाना नाही, शेतकऱ्यांना स्वत: बाजारातून २० ते २५ रुपये प्रतिनगाप्रमाणे बारदाना खरेदी करून नंतर धान भरून केंद्रावर आणावे लागते. केंद्रावर त्यांना फक्त एका बारदान्यामागे १५ रुपये दराने दिले जाते. तसेच डी.बी.टी. सारख्या योजनेमार्फत आदिवासी विद्यार्थ्यांचे जेवण हिसकावून घेतले जात आहे. अशाप्रकारे शासन आदिवासी लोकांचे आर्थिक शोषण करीत आहे, असे शासन पहिल्यांदाच या राज्याला लाभले आहे, ही एक शोकांतिका आहे, असे म्हटले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज कोल्हारे यांनी केले. संचालन कविता उईके यांनी केले तर आभार अजय सलामे यांनी मानले. यशस्वितेसाठी बिरसा मुंडा स्मारक समितीचे अध्यक्ष संदीप गावळ, उपाध्यक्ष सुशील टालटे, सचिव अजय सलामे, कार्याध्यक्ष रवी भोयर, सहसचिव तुलसीराम सलामे, कोषाध्यक्ष विकास सिडाम, सहकोषाध्यक्ष प्रदीप गाते यांच्यासह सर्व सदस्यांनी सहकार्य केले.