वकिलांची राज्यस्तरीय परिषद उद्यापासून

0
11

नागपूर : बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवातर्फे १४ व १५ मार्च रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात वकिलांची राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषदेत २००० वर वकील सहभागी होणार आहेत.

कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. आसिफ कुरेशी यांनी गुरुवारी परिषदेची विस्तृत माहिती दिली. १४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता मुख्य अतिथी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय ललित अध्यक्षस्थानी तर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई, राज्याचे महाधिवक्ता सुनील मनोहर, गोवाचे महाधिवक्ता ए. एन. एस. नाडकर्णी, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, बार कौन्सिल आॅफ इंडियाचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. उद्घाटनानंतर स्वरवेध संस्थेचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. १५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता समारोपीय कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथी तर, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती वासंती नाईक, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक व बार कौन्सिल आॅफ इंडियाचे उपाध्यक्ष भोजे गवडा सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तत्पूर्वी, विविध विषयांवर व्याख्याने होतील, असे कुरेशी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत अ‍ॅड. आशिष देशमुख, अ‍ॅड. अनिरुद्ध चौबे, अ‍ॅड. रश्मी खापर्डे आदी उपस्थित होते.