आठवडाभरातच उखडले राज्यमार्गावरील पॅचेस

0
8

तुमसर,दि.26 : आठवडाभरापूर्वी तुमसर-कटंगी राज्यमार्गावरील पॅचेसचे काम पार पाडण्यात आले होते. मात्र बोटांवर मोजण्याइतपत दिवसातच ते पॅचेस उखडल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. तुमसरच्या जुना बसस्थानक ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेपर्यंतच्या मार्गावरील खड्डे पुन्हा तोंड वर करताना दिसून आले आहेत. येथे संबंधित कंत्राटदाराने होईल त्या पद्धतीने पॅचेसचे काम पार पाडले आहे. मात्र, तो मार्ग मध्यप्रदेशाला जोडणारा व्यस्त राज्यमार्ग आहे; याचा विसर त्या कंत्राटदाराला पडला आहे. ३०० मीटरच्या त्या मार्गावरील पॅचेस पुन्हा उखडल्याने येथे चौकशीची मागणी काँग्रेस युवा नेते डाॅ.पंकज कारेमोरे यांनी केली आहे. तर, तुमसर-कटंगी मार्ग पुन्हा जिवघेणा ठरतोय की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे..

कटंगीमार्गे मध्यप्रदेशाला जोडणारा तो राज्यमार्ग तुमसर शहराच्या मध्यातून जातो. दिवस-रात्र त्या मार्गाने जड वाहतूक होत असते. जुना बसस्थानक ते रेल्वेटाउनपर्यंतचा मार्ग अतिशय खड्डेमय झालेला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने चालू महिन्याच्या सुरुवातीलाच त्या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम काढले होते. मात्र डांबरीकरणाने बुजविण्यात आलेले ते खड्डे पुन्हा उखडले आहेत. येथे ठिकठिकाणच्या पॅचेसमधील काळी गिट्टी चक्क रस्ताभर पसरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र, निद्रिस्त विभाग त्या प्रकारापासून अनभिज्ञ असल्यागत परिस्थिती हाताळताना दिसत आहे. शासनाचा निधी अयोग्य पद्धतीने लाटण्याचे जणू सत्रच सुरू असल्याचे यावरून दिसून येत आहे.कटंगीमार्गे मॉईलच्या जड वाहतूक व्यतिरिक्त शासकीय व खासगी बसेस, हलकी वाहने, प्रवासी वाहने, दुचाकी यांसारख्या वाहतुकीने तो मार्ग व्यस्त राहतो. याच मार्गावरून नावाजलेल्या शालेय संस्थांकरिता विद्यार्थी सायकलने प्रवास करतात. येथे दुचाकी तथा सायकलस्वारांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याच मार्गानेे मॉईलच्या रुग्णवाहिका नित्य धावतात. त्यात उखडलेल्या जिवघेण्या खड्ड्यांच्या ५० मीटर अंतरावर शासकीय उपजिल्हा रुग्णालय आहे, हे विशेष. .

पॅचेस भरण्याचे केलेले काम आठवडाभरात उखडत आहे. येथे सामान्य नागरिक तथा प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. येथे संबंधित विभागाने कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करून पॅचेस त्वरित भरण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा जड वाहतूक त्या मार्गाने पूर्णत: बंद करण्यात येईल. त्याला प्रशासनच सर्वस्वी जबाबदार राहणार असल्याचे डॉ. कारेमोरे यांनी म्हटले आहे..