तालुका काँग्रेसचा शेतकरी आक्रोश मोर्चा गुरुवारी

0
10

अर्जुनी मोरगाव,दि.27 : तालुका काँग्रेस कमिटी अर्जुनी मोरगावच्या वतीने शेतकरी, शेतमजूर युवा, सुशिक्षित बेरोजगार, महिला व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाववर २७ डिसेंबरला दुपारी १२ वाजता शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा. नाना पटोले करणार आहेत.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, धानाला २५०० रुपये प्रती क्विंटल हमीभाव, बेरोजगारांच्या हाताला काम, शासकीय कार्यालयातील रिक्तपदांची भरती, शेतमजुरांसाठी रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ, धानाला प्रती क्विंटल ४०० रुपये बोनस, महिला बचत गटांना शुन्य टक्के व्याजाने कर्ज, नोंदणीकृत कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ, वनहक्काचे सामूहिक व वैयक्तिक पट्टे त्वरीत देण्यात यावे, गरजुंना प्रधानमंत्री आवास योजना व घरकुलांचा त्वरित लाभ देण्यात यावा, तुडतुडा व दुष्काळी लाभ देण्यात यावा, इटियाडोह धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी सिंचनाची व्यवस्था त्वरित करून द्यावी, एस.पी., एस.टी., एन.टी. व ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरित त्यांचे बँक खात्यात जमा करावी, मासेमारी करणाऱ्या संस्थाची तलावाची लिज माफ करण्यात यावी, हमीभाव केंद्रावर सुरू असलेली शेतकऱ्यांची लूट थांबविण्यात यावी, अवकाळी पावसामुळे धान शेती व कडधान्य पिकांचे नुकसानीचे सर्व्हे करून त्वरित भरपाई देण्यात यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, घरकुल लाभार्थ्यांना स्वस्त दरात रेती उपलब्ध करून द्यावी, मका या पिकाची आधारभूत भावाने खरेदी करावी, वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये रूपांतरीत प्रक्रियेची त्वरित अंमलबजावणी करावी, सुशिक्षित बेरोजगार तरूणांना ४ हजार रुपये बेरोजगारी भत्ता देण्यात यावा, महिला बचत गटांचे कर्ज माफ करण्यात यावे या मागण्यासंदर्भात शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा दुर्गा चौक अर्जुनी मोरगाववरून तहसील कार्यालयावर जाणार आहे. या मोर्चात तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनी सहभागी होण्याचे आवाहन अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे..