स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान यशस्वीतेसाठी जनतेनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे

0
16

गोंदिया,दि.२५.: राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०१९ पर्यंत जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी जनतेनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
२४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाबाबत बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ.आर.जे.पराडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्रात १९८१ मध्ये दर दहा हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण ६१ कुष्ठरोगी असे होते. आज हे प्रमाण महाराष्ट्रामध्ये १ पेक्षा कमी झाले आहे. परंतू गोंदिया जिल्ह्यात दर दहा हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण १ पेक्षा जास्त (पीआर २.९६) आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०१९ पर्यंत कुष्ठरोग निवारण पंधरवाडा जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने २६ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये कुष्ठरोग भयमुक्त गाव व कुष्ठांतेय संबंधी प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात विविध समिती गठीत करुन कार्यशाळा, प्रशिक्षण, जनजागरण व प्रसिध्दीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी/आशा यांचेमार्फत प्रत्येक ग्रामसभेत कुष्ठरोगाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
सदर कार्यक्रम राष्ट्रीय अभियान असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, सामाजिक घटक, शासकीय/निमशासकीय कार्यालयातील विभाग प्रमुख, प्रसार माध्यमे, शाळा/महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच जनतेनी अभियान यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. सभेला डॉ.जे.आर.राऊत, अर्चना वानखेडे, डॉ.सीमा यादव, यु.एस.राठोड उपस्थित होते.