स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव- वर्षा पटेल

0
21

गोंदिया,दि. ०१:: शहरातील मोठमोठ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकविण्यासाठी ग्रामीण भागातील लोक आपल्या मुलांना पाठवितात, परंतु त्या शाळांमध्ये एवढा भव्य मंच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध नसतो. अशाप्रकारे मंच ग्रामीण भागामध्ये देखील उपलब्ध होऊ शकतात, हे गोंदिया शिक्षण संस्थेच्या कामठा येथील जीईएस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने सिद्ध केले आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून येतो. त्याच प्रमाणे बचत गटाच्या माध्यमातून ्त्रिरयांचा विकास कसा होईल, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांचे उत्पन्न कसे वाढेल यासाठी मनोहरभाई पटेल ॲकॅडमी निरंतर प्रयत्नरत आहे, असे प्रतिपादन वर्षा पटेल यांनी केले..

जीईएस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कामठा येथे २८ ते ३१ जानेवारीदरम्यान आयोजित स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन होते. कार्यक्रमात परिसरातील ४६ महिला बचत गटांनी सहभाग घेतला. बचत गटातील महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतानाच त्यांच्याद्वारे तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू व पक्वांनांच्या स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्याद्वारे निर्मित वस्तू व पक्वांनांची विक्री करण्यात आली. यावेळी कामठा येथील वयोवृद्ध नागरिक व सामाजिक कार्यकर्ते समरूभाऊ सेवतकर आणि लंबाटोला येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक व सामाजिक कार्यकर्ते सुखलाल भुते यांचा समाजकार्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन तृष्णा चटर्जी व मनोज चव्हाण यांनी केले. कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी, पालक, परिसरातील गणमान्य नागरिक, ग्राम पंचायतीचे सरपंच, उपसरपंच सदस्य, तंमुसचे पदाधिकारी, विविध सेवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि विविध महिला बचत गटांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते