विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी

0
18
????????????????????????????????????
  • मतदान केंद्रांवर उपलब्ध सोयी-सुविधांचा आढावा

वाशिम, दि. १९ :  आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी जिह्यातील काही मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, मालेगावचे तहसीलदार रवी काळे उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी सर्वप्रथम मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील मतदान केंद्राची पाहणी केली. त्यानंतर मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा, कवरदरी, वरदरी बु. , वरदरी खुर्द, नागरतास, मालेगाव येथील ना. ना. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्र, डोंगरकिन्ही व भौरद येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रावरील पिण्याच्या पाण्याची सुविधा, संपर्काचे साधन, कनेक्टीव्हिटी, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रॅम्पची सुविधा यासह इतर बाबींचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर व्हीलचेअर उपलब्ध ठेवावी. तसेच रॅम्पही सुस्थितीत असावा. दिव्यांग मतदार मतदानासाठी आल्यानंतर संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी त्यांना मतदान कक्षात जाण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी यावेळी दिल्या. ज्या मतदान केंद्रांवर नेटवर्क अभावी कोणत्याही प्रकारची संपर्क सुविधा उपलब्ध होवू शकत नाही, अशा ठिकाणी तातडीच्या संपर्कासाठी वायरलेस सेट उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.