आचारसंहितेचे पालन करण्यासोबतच निवडणूकीचा खर्च दररोज सादर करा- डॉ.कादंबरी बलकवडे

0
29

राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक
गोंदिया दि.१९.: येत्या ११ एप्रिल रोजी होणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसोबत काही उमेदवार अपक्ष म्हणूनही निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आचारसंहितेचे पालन करणे सर्व पक्षांना तसेच उमेदवारांना बंधनकारक असून त्यांना निवडणूकीचा खर्च दररोज सादर करणे देखील बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज १९ मार्च रोजी आयोजित राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आचारसंहिता अंमलबजावणी आणि स्वीपचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, निवडणूक खर्चाचे नोडल अधिकारी तथा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची उपस्थिती होती.
डॉ.बलकवडे म्हणाल्या, निवडणूकीत होणारा उमेदवाराचा आणि पक्षाच्या खर्चाचा दैनंदिन अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी भंडारा यांना पाठविण्यात येणार आहे. पक्षाच्या आणि उमेदवाराच्या प्रत्येक खर्चाचा हिशोब संबंधितांना व्यवस्थीत ठेवावा लागणार आहे. एका उमेदवाराला निवडणूक खर्चाची मर्यादा ही ७० लक्ष रुपये इतकी आहे. प्रचाराच्या कामात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यात सर्वत्र प्रचाराची परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असतील. एका विधानसभा क्षेत्रात परवानगी देण्याचे अधिकार संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना तर एकापेक्षा जास्त क्षेत्रात प्रचाराची परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. प्रचार गाडीत वाहनचालकासह पाच व्यक्तीच प्रचारासाठी ग्राह्य धरण्यात आले आहे. सभा आणि रॅलीसाठी आवश्यक त्या परवानग्या देण्याचे अधिकार संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना आहे. आचारसंहितेचे उल्लंघन व खर्चाबाबत भरारी पथके तैनात करण्यात आली असून ती १५ मिनिटातच घटनास्थळी पोहोचतील.
विविध वस्तू व साहित्य खरेदीचे भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातून दरपत्रके मागविण्यात आल्याचे सांगून डॉ.बलकवडे म्हणाल्या, त्यानुसार चहा, जेवण, नास्ता, निवडणूक प्रचार साहित्य, वाहनाचे दर निश्चित करण्यात आले आहे. कुठलाही खर्च कमी दाखविणे ही सुध्दा गंभीर बाब आहे. उमेदवाराला त्याचे समाजमाध्यमांचे पत्ते नामनिर्देशन पत्र दाखल करतांना भरुन दयावे लागणार आहे. उमेदवाराव्यतिरिक्त इतर कोणी त्याचा खर्च करीत असेल त्यावर लक्ष राहणार असल्याचे डॉ.बलकवडे यांनी सांगितले.डॉ.दयानिधी म्हणाले, आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास त्याची तक्रार सी-व्हीजील ॲपवर करता येईल. आधी हे ॲप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करावे लागेल. ज्याने तक्रार केली आहे त्याचे नाव गोपनीय राहील. १०० मिनिटाच्या आत त्या तक्रारीवर कार्यवाही करण्यात येणार आहे. हे ॲप म्हणजे नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र तर निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा ठरणार आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे देखील आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करता येईल. पक्ष कार्यकर्ते यांचा निवडणूक प्रचार काळात भाडे/भत्ता निश्चित करण्यात आला आहे. मतदान प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी यांचा भत्ता देखील पक्षाने दयावा. त्याचा पक्षाच्या खर्चात समावेश करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
श्री.चौधरी म्हणाले, येत्या २२ मार्च रोजी इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनचे सरमिसळीकरण करण्यात येणार आहे. ही प्रक्रियाच पारदर्शक राहणार आहे. इव्हीएम असलेल्या वाहनावर जीपीआरएस सिस्टीम राहणार आहे. निवडणूकविषयी आलेल्या कोणत्याही तक्रारींची वेळीच दखल घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.जवंजाळ म्हणाले, प्रत्येक उमेदवाराला दररोज होणाऱ्या खर्चाचा हिशोब ठेवावा लागणार आहे. या खर्चाची तपासणी काटेकोरपणे केली जाणार आहे. प्रचार, रॅली, सभा यामध्ये होणाऱ्या खर्चावर सुध्दा बारीक लक्ष राहणार आहे.
श्री.खडसे म्हणाले, माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून पेडन्यूजवर विशेष लक्ष राहणार आहे. वृत्तपत्रातील, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातीवर सुध्दा देखरेख राहणार आहे. पोलीस विभागाच्या सायबर सेलच्या माध्यमातून समाजमाध्यमांवर देखील करडी नजर राहणार आहे. ऑडिओ-व्हिडिओ प्रचाराचे सा‍हित्य प्रसारण करण्यापूर्वी एमसीएमसी कमिटीकडे दाखल झाल्यानंतर समितीच्या परवानगीनंतर प्रचार-प्रसारासाठी मान्यता देण्यात येणार असल्याचे त्यांनी सां‍गितले.
यावेळी उपस्थित विविध राजकीय पक्ष प्रतिनिधींनी चहा, जेवण, नास्ता, प्रचाराचे साहित्य, वाहन भाडे, मतदान प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी यांना देण्यात येणारे मानधन तसेच राजकीय पक्षांना निवडणूकीदरम्यान लागणारे साहित्य व सामुग्रीच्या दरपत्रकाबाबत विस्तृत चर्चा केली.