बालमृत्यूचे कारणच कुपोषण-विवेक पंडित

0
23

गडचिरोली,दि.03 : आतापर्यंत कुपोषणाने बालकांचे मृत्यू होतात हे आरोग्य यंत्रणा मान्य करत नव्हती. पण मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा बालमृत्यूचे कारण भूक असू शकते हे सांगितले आहे. कुपोषित बालकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन त्यांना वेगवेगळे आजार जडतात. त्यातून त्यांचा मृत्यू होतो. बालमृत्यूंचे मूळ कुपोषणात आहे. त्याचा योग्य तो छडा लावा, अशी सूचना राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी केली.
आदिवासी विभागाअंतर्गत चालणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी ते दोन दिवसांच्या गडचिरोली दौºयावर आले. मंगळवारी दुपारी गडचिरोलीत पोहोचताच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ.संदीप राठोड, आदिवासी प्रकल्प अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांच्यासह सर्व विभागांचे जिल्हास्तरिय अधिकारी उपस्थित होते.
पेसा कायद्यांतर्गत (आदिवासीबहुल क्षेत्र) येणाऱ्या गावांमध्ये रिक्त पदांची भरती करताना ग्रामसभेच्या शिफारसीनुसार उमेदवाराची निवड केली जाते. त्यातून अनेक समस्या उद्भवतात. त्या क्षेत्रातही गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड व्हावी अशी सूचना सीईओ डॉ.राठोड यांनी केली.
पोषण आहारात दिला जाणारा रेडिमेड पाकिटबंद आहार मुले खात नव्हती. परंतू सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर तो आहार बंद करून तांदूळ, मूग डाळ, मसूर डाळ दिली जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल.लामतुरे यांनी बैठकीत दिली.
स्वस्त धान्य दुकानांमधून बायोमेट्रिक पद्धतीने धान्यवाटप होते म्हणजे पारदर्शकता आली असे होत नाही. धान्याचे योग्य प्रकारे वाटप होते किंवा नाही याची सरप्राईज व्हिजीट मधून तपासणी करण्याचे निर्देश पंडित यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीनंतर पंडीत यांनी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे पदाधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यातही जिल्ह्यातील विविध अडचणींवर चर्चा झाली.