मुद्रा महिला मेळावा उत्साहात;द्योजक महिलांचा सत्कार

0
10

आमगाव ,दि:३.: महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गोंदिया, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना समन्वय समिती, नियोजन विभाग व स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगाव यांच्या संयुक्त वतीने आज ३ जुलै रोजी आमगाव येथील लक्ष्मणराव मानकर फार्मसी कॉलेजमध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.माजी महिला व बालकल्याण समिती सभापती सविता पुराम होत्या. पं.स.सदस्य छबूताई उक, सिंधूताई भूते, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे सदस्य नंदकिशोर साखरे, स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्ष शांता चंद्रिकापुरे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती पुराम यावेळी म्हणाल्या, बचतगटाच्या माध्यमातून महिला  आज सक्षम झाल्या आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत. ज्या वैयक्तीक लाभाच्या योजना आहेत त्याचा लाभ बचतगटाच्या महिलांनी घेतला पाहिजे. ज्या महिलांना उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांना निश्चितपणे या योजनांचा लाभ मिळवून देवू. महिलांनी व्यसनापासून दूर रहावे. भावी पिढी घडविण्याचे काम महिलांचे आहे. ज्या गावात १५ पेक्षा जास्त बचतगट आहेत त्यांच्यासाठी कार्यालय सुरु करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.जागरे म्हणाले, बेरोजगारी दूर करण्यासाठी तसेच शेतीपूरक अनेक व्यवसाय सुरु करण्यासाठी राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या अनेक योजना आहेत. विविध प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी हया योजना असून या योजनांचा लाभ घेवून आपले जीवनमान उंचावता येते. त्यासाठी अनुदान देखील देण्यात येते. कुक्कुटपालन, बकरीपालन, शेतीशी संबंधीत योजना तसेच गोदाम बांधण्याची योजना नाबार्डकडून राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.बेदरकर म्हणाल्या, स्त्रीमध्ये मोठी शक्ती आहे. महिलांनी स्वत:ला कमजोर समजू नये. तसेच स्वत:ला दुर्भाग्यवती सुध्दा समजू नये. मुले घडविण्याचे काम आई करते. नवनिर्मीतीची क्षमता महिलांमध्ये आहे. मुलींनी स्वत:चे रक्षण करण्यासाठी कराटे शिकले पाहिजे असे त्या म्हणाल्या.
श्रीमती रामटेके म्हणाल्या, आज ७५ टक्के महिला कर्करोगाने ग्रस्त आहेत. विषमुक्त अन्न खाण्यात येत असल्यामुळे आणि सॅनीटरी नॅपकीनचा योग्य वापर करण्यात येत नसल्यामुळे हा आजार बळावला आहे. बचतगटातील महिलांनी आता परसबागेतून विषमुक्त अन्न घेवून ते खावे. त्यामुळे महिलांना आजाराचा सामना करण्याची वेळ येणार नाही असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री.खडसे, श्री.साखरे, श्रीमती भूते, श्रीमती उके यांनीही उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या लाभार्थ्यांना कर्ज मंजूरी पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यामध्ये वळद येथील उमा रहांगडाले यांना वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक ५० हजार रुपये, कुंभारटोली येथील संगीता निकोसे यांना वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक ५० हजार रुपये, किक्रीपार येथील इश्वरी बिसेन यांना वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक ५० हजार रुपये, रिसामा येथील रिना महापात्रे यांना बॅक ऑफ इंडियाच्या वतीने ५० हजार रुपये, रिसामा येथील लक्ष्मी कोरे यांना बॅक ऑफ इंडियाच्या वतीने ५० हजार रुपये, संभुटोला येथील दुर्गा लिल्हारे यांना बॅक ऑफ इंडियाच्या वतीने ५० हजार रुपये, माल्ही येथील हिरामन शेंडे यांना कॅनरा बँकेच्या वतीने ५० हजार रुपये, किक्रीपार येथील बाबुलाल तावडे यांना कॅनरा बँकेच्या वतीने ५० हजार रुपये यांचा समावेश आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने कुनबीटोला येथील तुलसी महिला बचतगटाला ५ लक्ष रुपये, सावित्री महिला बचतगटाला दिड लाख रुपये, बोरकन्हार येथील जमुना बकरी व्यवसाय गटाला साडेसात लाख रुपये, धोबीटोला येथील नेतृत्व महिला बचतगटाला साडेसात लाख रुपये कर्जाचे वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल रिसामा येथील उन्नती ग्राम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानीत करण्यात आले.
बंजाराटोला येथील कौशिक बिसेन या विद्यार्थ्याने दहावीमध्ये ९० टक्के गुण घैतल्याबद्दल त्याला सन्मानीत करण्यात आले. किक्रीपार येथील यशस्वी महिला बचतगटाने नृत्य तर पानगाव येथील आदर्श बचतगटाने नाटिका सादर करुन उपस्थित मान्यवर व महिलांची प्रसंशा मिळविली.
कार्यक्रमाला आमगाव तालुक्यातील माविमच्या बचतगटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी काही बचतगटांनी साहित्य व खाद्यपदार्थाचे स्टॉल लावले होते. यावेळी लकी ड्रॉ काढण्यात येवून संगीता बिसेन, निलीमा वाघमारे व छाया कुर्वे यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आले. प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी केले. संचालन तालुका व्यवस्थापक आशा दखने यांनी केले. उपस्थितांचे आभार पुष्पकला खैरे यांनी मानले.