पालकमंत्र्यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचे उदघाटन

0
16

भाववाढीसाठी शासन सकारात्मक- पालकमंत्री बडोले

गोंदिया,दि.८ : उन्हाळी आधारभूत किंमत धान खरेदी केंद्राचे उदघाटन आज (ता.८) पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते अर्जुनी/मोरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे करण्यात आले. यावेळी माजी आ.दयाराम कापगते, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा मार्केटींग अधिकारी श्री.खर्चे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कासीम जामा कुरेशी, जि.प.चे माजी कृषी समिती सभापती उमाकांत ढेंगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य केवलराम पुस्तोडे, डॉ.नाजुकराव कुमरे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नामदेवराव कापगते, उपाध्यक्ष होमराज ठाकरे, रचनाताई गहाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले धान खरेदी केंद्राच्या उदघाटन प्रसंगी म्हणाले, धानाच्या दरवाढीसाठी शासन सकारात्मक असून निश्चितच दरवाढ केली जाणार आहे. धानाचे दर वाढले पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी या निमित्ताने पूर्ण केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून दर वाढीची मागणी मुख्यमंत्री फडणवीस हे पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, राईस मिलर्सला पिसाई करण्यासाठी दिलेला धान १५ दिवसात पिसाई करुन तो फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाला (एफसीआय) दयावा. गोदाम, वाहतूक व हमालभाडे कमी आहे याची चर्चा झाली असून लवकरच यामध्ये दरवाढ करण्यात येईल.
धान खरेदीकडे जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी लक्ष दयावे. ज्या संस्थेकडे स्वत:ची जमीन आहे त्या संस्थेला गोदाम बांधून देण्यात येईल. त्यामुळे खरेदी केलेला धान उघड्यावर न राहता गोदामामध्ये राहील. धानाच्या नासाडीचे प्रमाण कमी होईल असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.