आधारकार्ड लिंकमध्ये गोंदिया राज्यात अव्वल

0
12

नागपूर दि.१० : विदर्भात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व राज्य शासनाच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांची स्थिती समाधानकारक असल्याचे मत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे केंद्रीय सहसंचालक आर. सुब्रम्हण्यम यांनी व्यक्त केले.मनरेगा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये मजुरांचे जॉबकार्ड बनविताना गोंदिया जिल्हा आधारकार्ड लिंक करण्यात राज्यात अव्वल स्थानी असून, इतर जिल्ह्यांनी गोंदियाचा आदर्श घेण्याचे सहसचिवांनी सांगितले.विदर्भातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ही बैठक विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली.

आर. सुब्रम्हण्यम म्हणाले की, दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी पावसाचा पडणारा थेंब न् थेंब जमिनीत मुरवायचा आहे. त्यासाठी माथा ते पायथ्यापर्यंत पाणी अडविल्यास भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्यात शासनाला नक्कीच यश मिळेल. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार आहे. त्यासाठी विहीरी, नालेबांधबंदिस्ती, नालाखोलीकरण, या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामध्ये लोकांना सहभागी कसे करुन घेता येईल, याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.
नरेगाच्या कामांच्या माध्यमातून दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या शेतात रस्ते पोहचविणे आवश्यक असून नरेगा म्हणजे केवळ वृक्षारोपण करणे नाही. येथील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हे शासनाचे एकमेव उद्दिष्ट असून, त्यासाठी दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांना ही एक सुवर्णसंधी आहे. हे एक आव्हान असून ते सर्वांना स्वीकारले पाहीजे, असे आर. सुब्रम्हण्यम यांनी सांगितले.

गोंदिया जिल्ह्यात एकूण 193623 असून, त्यापैकी 172693 जणांचे आधार नंबर जोडण्यात आले आहेत. ही टक्केवारी 89.19 असून, राज्यातील टॉपटेनमध्ये विदर्भातील अनुक्रमे भंडारा (84.94), नागपूर (83.95), बुलडाणा, अकोला (79.15), चंद्रपूर (77.03), वाशिम (75.09), अमरावती (73.98), तर कोल्हापुर (81.03) आणि जळगाव (72.36) असा अनुक्रमे पाचव्या आणि दहाव्या क्रमांकावर असल्याचे मुथ्थुकृष्णन शंकरनारायण यांनी सहसचिवांना सांगितले.
प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात शेततळे बनवून पावसाच्या पाण्याचे संधारण करा, विहीरी तसेच कुपनलिकांचे पुनर्भरण करण्यासाठी त्यांना शेतावर जाऊन मार्गदर्शन करा. कारण दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी शेतकऱ्यांना जलसाक्षर करण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्याचे काम अधिकाऱ्यांवर आहे. विदर्भातील नरेगाच्या कामांची स्थिती ही भलेही समाधानकारक असली तरी येथील अधिकाऱ्यांनी इतक्यात समाधान मानू नये, असा सल्ला देत, खरेतर ही अधिकाऱ्यांची लिटमस टेस्ट असल्याचे नरेगाचे सहसंचालक म्हणाले.
यामध्ये जलसंधारणाची 40648 कामे सुरु आहेत. त्यापैकी राज्यात 3495 कामांचा सहभाग असून विदर्भात 1299 कामे सुरु असल्याचे मनरेगाचे आयुक्त मुथ्थुकृष्णन शंकरनारायण यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी राज्यातील मनरेगा अंतर्गत सुरु असलेल्या विदर्भातील कामांची थोडक्यात माहिती दिली. मनरेगाच्या मजुरांची उपस्थिती त्यांचे वेतन त्यांच्या आधारकार्ड, जलसिंचनाची कामांची सद्यस्थितीचा अहवाल, नालाखोलीकरण, शेततळे, मामातलाव, सिमेंटनाला, शेतकऱ्यांच्या कामांची माहिती त्यांनी केंद्रीय सहसचिवांना दिली.
नरेगाचे सहसचिव आर. सुब्रम्हण्यम यांनी विदर्भातील मनरेगा अंतर्गत कामे करणाऱ्या मजुरांचे वेतन, वेतनाचे रजिस्टर अद्ययावत ठेवणे त्यांच्या वेतनासाठी आधार कार्ड त्यांच्या जॉबकार्डला लिंक करण्याच्या सूचना दिल्या. जॉबकार्डला आधार कार्ड लिंक केल्यामुळे मजुरांना त्याचा लाभ तात्काळ होऊन कामात वेग येत असल्याचे त्यांनी सांगितले.