शहरे स्मार्ट होण्याबरोबरच स्वच्छ व्हावीत- मुख्यमंत्री

0
25

नागपूर दि. १३ : राज्यातील शहरे स्मार्ट करण्याअगोदर ती शहरे स्वच्छ करण्याचा निर्धार सर्वांनी करावा. त्याचबरोबर स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छतेच्या सप्तपदीचे स्वप्न निश्चितपणे साकारण्यासाठी सर्वांनी संकल्प करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले.
येथील चिटणवीस सेंटर येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत `संकल्प स्वच्छतेचा, नागपूर विभागाचा` या एक दिवसीय कार्यशाळेच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर, नगरपालिका प्रशासनाच्या आयुक्त तथा संचालक मीता राजीव लोचन यांची उपस्थिती होती.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या कामगिरीवरच यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांना राखीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या नगरपालिका कचरा व्यवस्थापनासाठी पुढाकार घेऊन स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सक्रिय सहभागी होतील, अशा पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांचा गौरवही करण्यात येईल. त्याचबरोबर संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे मागील तीनवर्षांसह यंदाच्या वर्षाच्या शेवटी चारही पुरस्कार देण्याचा समारंभही लवकरच होईल. तसेच ज्या महापालिका, नगरपालिका यांची कामगिरी चांगली असेल अशा पालिकांना भरघोस अनुदान देण्यात येईल.
कचरा ही समस्या सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून शाश्वत तंत्रज्ञानावर भर देत आहे. शहरांनीही फक्त पायाभूत सुविधांच्या निर्मितीबाबत प्रयत्नशील राहण्यापेक्षा स्वच्छतेबाबतही जागरूक राहावे, स्मार्ट शहरे होण्याआधी स्वच्छ शहरे झाली पाहिजेत. स्वच्छता ही बहुआयामी बाब असल्याने त्याबाबतची कार्यवाही केवळ शासकीय पातळीवर यशस्वी होणार नाही. त्यात लोकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींसह सर्वांनी या अभियानाचे नेतृत्त्व करावयाचे आहे. त्याकरिता शपथ घेऊन स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प करूयात असे म्हणून त्यांनी सर्वांकडून स्वच्छतेचा संकल्प सामूहिकरित्या शपथ घेऊन केला.
सप्तपदीत समाविष्ट असणाऱ्या सहभागाचा ठाम निर्धार, व्यापक लोकसहभाग, शंभर टक्के शौचालयाचाच वापर, कचऱ्याचे संकलन-वर्गीकरण-वाहतूक, कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया, सांडपाण्यावर प्रक्रिया आणि हरित स्वच्छ महाराष्ट्राची निर्मिती, या सात मुद्यांची प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रात परिवर्तन घडू शकेल, असा विश्वासही मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री यांनी केंद्राच्या धर्तीवरच महाराष्ट्र शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे. परंतु हे अभियान एक लोकचळवळ व्हावी. देशात महाराष्ट्र हे पहिले कचरामुक्त राज्य व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. याकरिता सर्वांनी पुढाकार घेऊन अभियान यशस्वी करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी महापौर प्रवीण दटके यांनीही या अभियानात सक्रिय सहभाग राहणार असून नागपूर शहर राज्यात आदर्श शहर राहील, असा संकल्प केला असल्याचे सांगितले.
नगरपालिका प्रशासनाच्या आयुक्त तथा संचालक मीता राजीव लोचन म्हणाल्या, प्रत्येक नगरपालिकेने आपला महाराष्ट्र, आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडायला हवी.
विभागातील चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार, वर्धाच्या नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, देवळीच्या शोभाताई तडस, राजुऱ्याच्या मंगलाताई आत्राम, ब्रम्हपुरीच्या रिता गुऱ्हाडे, मूलच्या रीना भेरकर, भद्रावतीचे अनिल धानोरकर, वरोऱ्याच्या जनाबाई पिंपळशेंडे, पवनीच्या रजनी मोटघरे, तुमसरचे अभिषेक कारेमोरे व वडसा- देसाईगंजचे विनोद जाधव आदी नगराध्यक्षांसह मुख्याधिकाऱ्यांनी स्वच्छतेचा संकल्प करून 2015 अखेरपर्यंत स्वच्छ महाराष्ट्रासाठी संपूणरित्या सक्रिय राहणार असल्याचे यावेळी सांगितले.
प्रास्ताविकात नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर–पाटणकर म्हणाल्या की, कार्यशाळेतून प्रत्येकाने स्वच्छतेचा संकल्प करूनच त्याच्या अंमलबजावणीसाठी अथक परिश्रम करावे. कचरा व्यवस्थापन करताना शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया करावी, असे सांगून अभियाना मागील भूमिका आणि आवश्यकता स्पष्ट केली.
कार्यशाळेची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छतेचा संकल्प करून सामूहिक शपथ देऊन करण्यात आली. प्रारंभी कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप भिडे यांनी केले.

कार्यशाळेत स्वच्छतेचा जागर

स्वच्छ महाराष्ट्र अभियान, नागपूर विभागाचा संकल्प या महापौर, आयुक्त, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी याकरिता आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत स्वच्छतेचा जागर झाला. त्याचबरोबर उपस्थितांनी अभियानात सक्रिय सहभाग घेऊन लोकसहभागातून 100 टक्के शौचालयाचा वापर, कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, वाहतूक, त्यावर शास्त्रोक्त प्रकिया, सांडपाण्यावर प्रकिया यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शंकांचे निरसनही करण्यात आले. कार्यशाळेस नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे श्याम वर्धने यांचीही उपस्थिती होती.
कार्यशाळेत नगर विकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर यांनी अभियानात सर्वांनी झोकून देऊन कार्य करावे. अभियान यशस्वीतेसाठी प्रयत्न, पॅशन आणि आत्मियता हवी आहे. ती आपणा सर्वांमध्ये असून आपल्यातील ऊर्जेला तंत्रज्ञानाची साथ देऊन अभियान यशस्वीतेसाठी सर्वांनी पुढे यायचे आहे. आपलं शहर सुंदर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून परिश्रम घेणे आवश्यक आहे. राजकीय नेतृत्व आणि प्रशासनाची साथ असल्यास असाध्य ते साध्य होते, यावर माझा विश्वास आहे. नेतृत्व तुम्ही करा प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य तुम्हाला असेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. संपूर्ण राज्यासह विदर्भ कचरामुक्त करण्यासाठी सर्वांनी निश्चय, संकल्प करूनच कार्यशाळेतून बाहेर पडायचे आहे, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. नगरपालिका प्रशासनाच्या आयुक्त तथा संचालक मीता राजीव लोचन यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून शंकांचे निरसन केले.
कार्यशाळेत उत्कर्षा कवडी यांनी शहरे हागणदरीमुक्त करणे यावर सविस्तर सादरीकरण केले. लोकसहभागातून घनकचरा व्यवस्थापन याविषयावर जनवाणीचे संचालक डॉ. किरण कुलकर्णी यांनी, तर सौरभ शहा यांनी घनकचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण आणि समीर रेगे यांनी सेंद्रीय कचऱ्यापासून हरित ऊर्जा याविषयावर सादरीकरण केले. तसेच प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. कार्यशाळेचे सूत्रसंचालन वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी केले.